कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव आहे. कोकणी निसर्गाबाबत आलेल्या सकारात्मक-नकारात्मक अनुभवांची शिदोरी गाठीशी बाळगलेली कोणीहि व्यक्ती व्यक्त होते तेव्हा ते ऐकत राहावं! समाजरचनेतील प्रबोधनाचे मुद्दे टप्प्याटप्यावर बदलतात. मागील दोनेक हजार वर्षांचा इतिहास अभ्यासला तर हे जाणवतं. पण प्रबोधनाची मुलभूत गरज कधीही संपत नाही. कालौघात जे चांगले असते तेच टिकते. समाजाची सामुहिक मानसिकता हा ‘मला पटत नाही’ म्हणून सोडून देण्याचा नव्हे तर अभ्यासाचा विषय आहे. भारतीय समाजमनाला गैर गोष्टी फार काळ आवडत नाहीत. सामाजिक मानसिकतेच्या या पार्श्वभूमीवर ‘भूत’ हा विषय इतकी शतके कसा काय टिकला? याच्या मुळाशी आपण जसजसे जायचा प्रयत्न करू तसतशी आपल्याला निसर्गातील या अद्भुत, अगम्य-अतर्क्य, अमानवीय सकारात्मक आणि नकारात्मक उर्जाकेंद्रांची अनुभूती येत जाईल.
‘कांतारा’ मधून प्रेरणा घेऊन कोकणसह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या ब्रह्मराक्षसाचे कथानक घेऊन ‘मुंज्या’ चित्रपट तयार झाला. कोकण किनाऱ्याच्या आतील भागातील लोकप्रिय लोककथा आणि कोकणातील शूटिंग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. खरंतर सत्तरच्या दशकापर्यंत सिनेमागृहातील रुपेरी पडद्यावर भूताची चाहूल लागली की पडद्यावरून नजर हटवून इतरत्र पाहाणारा, घाम फुटणारा किंवा खाली मान घालून बसणारा आपला प्रेक्षक होता. काहीअंशी असेलही. पण आजच्या डिजिटल काळातील पिढी ‘भूत’ विषय एन्जॉय करते आहे. भूतपट हे भयपटांपेक्षा अधिक मनोरंजन करत आहेत. कृष्णधवल ते रंगीत तंत्रज्ञानाचाही हा परिणाम असावा. मुंज्याने पहिल्या आठवड्यात ३३ कोटींचा व्यवसाय केला. कोणत्याही मोठ्या अभिनेत्याशिवाय कमी बजेट असलेले या धाटणीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळवतायत. अशा चित्रपटांच्या मुळाशी असलेल्या ‘भूत’ विषयाला ‘खोटं’ ठरविण्यापूर्वी ही उर्जा ‘नक्की कोणती असावी? आणि असं का घडत असावं?’ याचा शोध घ्यायला हवा. भूतकथा जगभर भेटतात. समाजमनावर त्यांचा पगडा इतकी वर्षे कसा टिकून राहतो? हे आपण ते समजून घ्यायला हवं आहे. दुसरीकडे सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेल्या याच कोकणात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारले. कोकणातील दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून असणारे. सह्याद्री सानिद्ध्यामुळे इथली भूमी बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी युक्त असल्याने इथले लोकं शरीराने काटक होतं. महाराजांनी सह्याद्रीसह कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेचा उपयोग करून घेतला. राजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी पश्चिम किनारपट्टीवर उभारलेलं आरमारी सामर्थ्य अभ्यासताना भूताखेतांच्या लोककथा अंगा-खांद्यावर खेळवणाऱ्या याच कोकणच्या भौगोलिकतेचा केलेला नियोजनबद्ध उपयोग जाणवतो. हेही लक्षात घेतले पाहिजे.
भुताखेतांचा त्रास होऊ नये म्हणून कोकणात इष्ट व आराध्य देवतांची नियमित व्रते आणि कुलाचार पाळून आपली योग्यता वाढवावी असे सांगितले जाते. ‘भूत’ या विषयावर व्यक्त होत असताना कोकणच्या निसर्गातील गुढता आणि पिढ्यांपिढ्या चालत आलेली इथली मानवी समाजव्यवस्था समजून घ्यायला हवी असे वाटते. कोकणात गावोगावी ग्रामदेवतेची उपासना चालते. ग्रामदेवता ही गावाचे रक्षण करणारी, संकटकाळी शक्ती देणारी देवता आहे. गाव उत्सवाच्या दिवशी तिला बलिदान देण्याची प्रथा आहे. ग्रामदेवतांना ठरलेली परंपरागत देणी न दिल्यास त्या रागावतात असेही मानले जाई. कॉलरा, देवी, प्लेग हे रोग परंपरागत देणी न दिल्याचा परिणाम म्हणून आणले जातात असेही मानले जाई. अगदी असाध्य अशा रोगावर कोणताच इलाज न चालल्यास तो दुष्ट शक्तीचा परिमाण आहे किंवा भुतांनी केलेला आहे असे मानले जात असे. याचा उपाय करण्यासाठी भगत, तांत्रिक-मांत्रिक असत. या अनुषंगाने थोडं कोकणच्या इतिहासात डोकावलं असता ‘भूत’ विषयाचा दरारा अस्तित्वात असल्याचे संदर्भ भेटतात. विजापूरच्या युसुफ आदिलशहाने कोकणात १५०२मध्ये सावित्री नदी ते देवगड पर्यंतच्या रत्नागिरीतील भागात खोतीची पद्धत सुरु केली होती. जमिनीच्या महसुलात सुलभता आणण्यासाठी ही व्यवस्था होती. प्रत्यक्षात मात्र या व्यवस्थेने अनेक नवे प्रश्न कोकणात निर्माण झालेले दिसतात. महादेवशास्त्री नावाचे प्रसिद्ध मांत्रिक जादूटोण्याच्या विद्येत प्रवीण असल्याचे समजल्यावर नाना फडणीस यांनी, तंत्रविद्येने ब्रिटीशांचा नाश करण्याकरिता किती काळ लागेल याची विचारणा करण्यासाठी आपला दूत पाठविला होता. कोकणात सामान्य लोकांचे दारिद्र्य, जमिनीच्या लहानशा तुकड्यावरून व इतर कारणांवरून होणारी भाऊबंदकी-भांडणे नित्याचीच बाब होती. ज्याच्याशी वाकडे असेल त्याच्यावर भूते घालणे हा सर्वसामान्य रिवाज होता. भूते घालण्याचे प्रकार वाढल्याने पेशवाईत, भूतांच्या चौकशीचे, बंदोबस्त करण्याचे आदेश दिल्याचे किस्से आहेत. कोकणात बलुतेदारी होती. १७६५च्या एका यादीत बलुतेदारांची संख्या अकरा, १७९९च्या यादीत बारा, १८१८च्या यादीत तेरा भेटते. सर्वांना जातीविषयक रीतीभातींचे रूढीने, नियमाने पालन कोकणात बंधनकारक होते. जगभरातील मानवी समाजात ‘गुलामगिरी’ हे लक्षण आढळते. कोकणही याला अपवाद नाही. ब्रिटीशकालीन कागदपत्रात याच्या नोंदी भेटतात. पेशवाईत भूतांच्या दहशतीने अनेक कुटुंबे नव्हे तर तळकोकणातील गावेच्या गावे स्थलांतरित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १७७४-७५ साली कोकणातील अंजनवेल, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड आणि सौंदळ तालुक्यात पेशवे सरकारने याकामी दोन अधिकारी नेमले होते. त्यांच्या मदतीला दोन कारकून आणि सहा शिपाई होते. या अधिकाऱ्यांना वर्षाला ३५० रुपये पगार आणि २६१ रुपये भत्ता ठरला होता. अधिकाऱ्यांनी गुन्हेगाराची शक्ती पाहून रुपये २५ ते ५० दंड करावयाचा अधिकार असे. भुते घालणाऱ्यांची आणि ती निवारण करणाऱ्यांची यादी वैद्यांच्या यादीप्रमाणे गावोगावच्या पोलीस पाटलांना माहिती असणे आवश्यक असायचे. ही यादी दर महिन्याला अद्ययावत व्हायची. असा दंडक असायचा. हे सारे १९व्या शतकापर्यंत सुरू असावे. पुढे ब्रिटिश राजवटीत बंद करण्यात आले.
भारताचा पश्चिमेकडील भाग हा सह्याद्री आणि समुद्र-खाड्यांच्या चिंचोळ्या पट्टीत विराजमान आहे. या प्रदेशाने स्वतःची अशी काही भूवैशिष्ट्ये सांभाळली आहेत. कोकणातील उंचचउंच सह्याद्रीच्या कडेकपारीत घोंगावणारा वारा, समुद्रावर उठणाऱ्या लाटा, सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहोचणार नाही अशी निबिड अरण्ये, दूरवर असणारी मनुष्यवस्ती, जुनाट व अजस्त्र वृक्षांचे अस्तित्व, पडकी घरे-वाडे-विहिरी, रात्रीच्या अंधाराला छेद देणारी अपुरी वीजव्यवस्था यामुळे भूतांचे (नकारात्मक उर्जा) प्राबल्य वाढले असावे. भूत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कोकणात पिशाच्च या नावानेही ते रूढ झाल्याचे दिसते. कोकणात चांगल्या-वाईट भूतकथा नाहीत असे गाव सापडणार नाही. इथल्या देवभोळ्या लोकांचा देवाइतकाच भूतांवरही विश्वास असावा. कोकणात भूतबाधा उतरवणाऱ्यांची, उपाय सांगणाऱ्यांची संख्याही विलक्षण असावी. मध्यरात्र उलटून गेलेल्या कोकणात रात्री काळाकुट्ट अंधारातील कोणत्याही घाटातील नागमोड्या वळणांच्या मोकळ्या रस्त्यावरून संततधार पावसात, वाऱ्याच्या झूळूकेत रातकिड्यांची किरकिर ऐकत प्रवास करताना गाडी अचानक बंद पडली तर? अर्थात दैव बलवत्तर असल्यास काहीतरी विचित्र अनुभूती येऊन गाडी आपोआप पुन्हा चालू होते आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो. अगदी आमच्याही लहानपणी सुट्टीत आजोळी किंवा गावी गेलो आम्ही भावंडं रात्री अंगणात बसून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगत असू. हा उद्योग कोकणात सर्वत्र चालायचा. भूताखेतांचे किस्से रंगायचे. लोकांच्या मांडणीत असे दाखले असायचे की त्यांना खोटं ठरवणं अडचणीचं ठरावं. गीतकार दिलीप शिंदे यांचं आनंद शिंदे यांनी गायिलेलं, ‘सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी! बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी’ हे गीतही आपल्याला कोकणातील भूत’लोक’कथा सांगतं. कोकणनजीक गोव्यात डिचोली तालुक्यातील साळ गावात होळी पौर्णिमेच्या तीन दिवसात 'गड्यांची जत्रा' म्हणून स्थानिक दैवत श्रीमहादेव यांची जत्रा भरते. या गड्यांच्या जत्रेला गेलेल्या माणसाला रात्री १२ नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत घरी परतता येत नाही असा नियम आहे. डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील श्रीलईराई देवीची जत्रा ही एप्रिल-मे महिन्यात होते. गोव्यातील या दोन गूढ आणि रहस्यमय जत्रा आहेत. कोकणात भगवान श्रीशंकर आणि देवी श्रीभवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक आहेत. भगवान श्रीशंकर यांच्या अधीन वेताळ, चाळा, राक्षस, भूतपिशाच्च असतात अशी श्रद्धा कोकणात आहे. या अज्ञात शक्तीला वर्षातून एकदा परंपरेनुसार मान दिला जातो. डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी ‘कोकणचा सांस्कृतिक इतिहास’ या ग्रंथात भुतांचे १६ प्रकार सांगितले आहेत. त्यात वेताळ हा पहिला असून त्याला भूतांचा राजा म्हटले जाते. मात्र भुतांच्या याच राजाची कोकणात पूजा केली जाते. आरवली, पेंडूर, वराड, कुणकेरी, ओटवणे, परुळे, पोईप, नाणोस या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात त्याची मंदिरे व मूर्ती आढळतात. कोकणातील गावात याला रक्षणकर्ता म्हणून मान्यता मिळालेली आहे. कोकणातील भुते अभ्यासताना हे समजून घ्यायला हवे आहे. भूत रात्रीचं का दिसतं? लोकमान्यता अशी की दिवसभर देवांचा वास पृथ्वीवर असतो. देवांच्या शक्ती सूर्याच्या उजेडासोबत सर्वत्र पोहोचतात. त्यामुळे अमंगळ शक्तींना बाहेर पडता येत नाही. दैवी शक्तींचा संकोच होऊन भूतं रात्री बाहेर पडतात. दुसरं कारणं असं असावं की, दिवसभरात सजीवांच्या हालचालींमुळे वातावरणात उष्णता वाढते. ही ऊर्जा दिवसा शक्तीमान असते. तिच्या प्रभावात निगेटिव्ह एनर्जी दबून जाते. रात्री जमिनीचा खालचा स्तर थंड होऊ लागतो. वीजेचा वापर कमी होतो. मोबाईलचे संदेश कमी होतात. उर्जेचा वापर मंदावतो. अशा शांततेत नकारात्मक उर्जा आपले अस्तित्व प्रकट करते. या उर्जेशी आपण परिचित नसल्याने भास होत राहातात. पण मग एखाद्या विशिष्ठ जागी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या वर्षी, एकमेकांना न ओळखणार्या लोकांना एकाच प्रकारचा भास का होतो? असेही प्रश्न पडतात.
कोकण हे गूढ गोष्टींचे भांडार आहे. येथील लोकसंस्कृतीवर भूत विषयाचा पगडा आहे हे नक्की. भूतांच्या अस्तित्वाची खात्री पिढय़ान्-पिढय़ा इथल्या मनुष्याने बाळगली आहे. भूतांचा उद्भव, संचार, इच्छेनुरूप रूपे धारण करण्याची शक्ती, पीडा देण्याचे, प्रसंगी भले करण्याचे सामर्थ्य, त्यांचा स्वभाव, त्यांची निवासस्थाने, शक्तीच्या मर्यादा, त्यांना प्रसन्न करून घेण्याचे वा हुकमतीत ठेवण्याचे उपाय, त्यांना प्रतिबंध करण्याचे उपाय, त्यांच्यावरील नियंत्रण शक्ती आणि या अनुषंगाने येणारे समज, रूढी आणि परंपरा यांचे फार मोठे विश्व आहे. कदाचित कोकणाचा विकास हा महाराष्ट्राच्या तुलनेत आजही विशेष झालेला नाही. त्यामुळे कोकणात आजही नकारात्मक शक्तींचे अस्तित्व असावे. कोकणात आजही घनदाट झाडी, अरण्य आहे. डोंगरकडे, घाट, एकाकी सडे, दूर असलेली घरे-वाड्या-वस्त्या गूढरम्य असतात. रात्रीच्या निरव शांततेत पान हलतात, वारा सुसाट येतो, नारळ-सुपारी डोलतात, ओहोळ, छोटे झरे खळखळ करत वाहत असतात. वाळलेल्या पानांच्या पातेऱ्यावर पाऊले टाकली की आवाज येतो. भोवताली अफाट गर्द झाडी, आसमंतात पक्षांचा किलबिलाट, घरी परतणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घंटा ऐकू येणाऱ्या एखाद्या तळ्याची ठिकाणी जिथे माणूस प्राणीहि दिसत नाही अशा ठिकाणी ते सवाष्ण बाईने सांजवेळी जायचे नसते. हे कोकणवासीयांच्या मनात पक्के आहे. भूत-पिशाच्च एक ऐतिहासिक वास्तव आहे. त्यावर संशोधन व्हायला पाहिजे. भूते ही त्रास देणारी व त्रास न देणारी या प्रकारात मोडतात. कोकणातील लोकसंस्कृतीवर भूत विषयाचा रंजक पगडा आहे. भुतांच्या अस्तित्वाविषयीची खात्री पिढय़ान् पिढय़ा कोकणी माणसाने बाळगली आहे. कोकणातील लोकांचा देवावर जेवढा विश्वास आहे तेवढाच भूतबाधेवरही आहे. याचमुळे गावागावात डॉक्टरप्रमाणे या विषयातले तज्ज्ञही असतात. अपवाद वगळता कोकणातील भुते त्रास देणारी नसावीत. कारण भूतांचे अस्तित्व नाकारण्यासाठी स्मशानभूमीत रात्र काढणारे अवलिया कोकणात भेटतील. कोकणाची भूमी अलौकिक उर्जेने संपन्न आहे. इथे अनेक सकारात्मक नकारात्मक घटनांचे किस्से ऐकायला येतात. भूत हा त्यापैकी एक प्रकार असावा. कोकणात आपण जेव्हा नैसर्गिक उर्जेने भरलेल्या ठिकाणी असतो तेव्हा आपल्याला अलौकिक अनुभव येतो. उर्जा जुळून येत नसेल तर कसलाही अनुभव येत नाहीत. आपण त्यावर विश्वासही ठेवू शकत नाही. कोकणात अलौकिक वातावरणामुळे लोकांना चांगले वाईट अनुभव येतात. या शक्ती ठराविक ठिकाणी वास्तव्य करून असतात. मनुष्यप्राण्याचा वावर नाही, स्वच्छता नाही. चिखल, पाणी, गच्चझाडी, डेरेदार वृक्ष, भव्य सरोवर, बंद पडलेली सदनिका, जुने मंदिर, पडलेला वाडा, पडलेली बुजलेली विहिर, जुनाट आड अशा ठिकाणी नकारात्मक शक्तींचे वास्तव्य असते. नकारात्मक शक्तींची स्वतःची एक वारंवारिता (फ्रिक्वेंसी) असावी. काही कारणाने आपण त्यात आलो तरच त्यांच्या अस्तित्वाचा अंदाज येतो.
आजही
कोकणातील अनेक देवळात पाषाण न्याय निवाडा पद्धतीद्वारे जनतेला सुखी ठेवण्याचे काम
सुरू आहे. कोकणातील गावरहाटीची संकल्पना समजून घेतली की नकारात्मक उर्जा समजणे
सोपे होईल. मागील किमान २० वर्षे आम्ही कोकणात व्यावसायिक कारणे बारमाही दिवसा-रात्री
ऊन-वारा-पावसात पनवेल ते पणजी अशी भ्रमंती करतो आहोत. निसर्गातील अद्भुत,
अगम्य-अतर्क्य, अमानवीय अनुभूती आम्हीही घेतल्या आहेत. अर्थात सह्याद्रीत आणि
कोकणात आम्हाला आलेल्या साऱ्या अनुभूती या सकारात्मक राहिल्यात. नकारात्मक अनुभूती
नाही असं नाही पण त्या आमच्यासोबत असलेल्यांना अधिक जाणवलेल्या आहेत. समर्थ रामदास
जवळपास चार दशकांच्या साधनेनंतर आपल्या घरी वृध्द आईला भेटायला आले. तेव्हा आईचे
डोळे गेले होते. हे लक्षात येताच समर्थांनी तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. आईला
दृष्टी आली. उघड्या डोळ्याने आईने समर्थांना विचारले, ‘इतके वर्ष बाहेर राहून
कोणते भूत वगैरे वश केलेस का? ही भूतचेष्टा कुठून शिकून आलास?’ यावर समर्थांनी
आईला अत्यंत गोड शब्दात मोजक्या पदात प्रभू श्रीरामांचे चरित्र ऐकवत सुंदर उत्तर
दिले. त्या पदाच्या शेवटी समर्थ म्हणतात, ‘सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे
रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥‘ बाकी ज्याची त्याची मर्जी!
धीरज
वाटेकर
मो.
९८६०३६०९४८
(पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि लेखक-पत्रकार धीरज वाटेकर
यांची पर्यटन आणि चरित्रलेखन विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली पंचवीस
वर्षेहून अधिक काळ ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग
आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)